
दैव देतं आणि कर्म नेतं अशीच परिस्थिती पाहायला मिळालेली आहे. एका व्यक्तीने स्क्रॅचकार्डवर 2 कोटींचे बक्षिस जिंकलं. परंत, आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्याला बक्षिसाची रक्कम अद्याप मिळालेली नाही.
ही घटना अल्जीरियातील एका व्यक्तीची आहे. त्याने बेल्जिअममध्ये एक स्क्रॅच कार्ड़ खरेदी केले होते. बेल्जियमच्या ब्रॉडकास्टर व्हीआरटीच्या माहितीनुसार, बक्षिसाची रक्कम जिंकूनही ती व्यक्ती ती रक्कम घेऊ शकली नाहीय. 28 वर्षीय या व्यक्तीकडे बेल्झियमचा कोणताही रहिवासी दाखला नव्हता. त्यामुळे त्याचे बॅंकेचे खाते उघडता आले नाही. जिथे त्याच्या बक्षिसाची रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते. बक्षिसाची रक्कम मोठी असल्याने ती रोखीने दिली जाऊ शकत नाही. त्यानंतर हे पैसे काढण्यासाठी व्यक्तीच्या मित्रानेही खूप प्रयत्न केले. व्यक्तीच्या मित्राकडे कागदांची पूर्तता असल्याने तो ब्रुसेल्स येथील लॉटरी हेडक्वार्टरमध्ये स्क्रॅचकार्ड घेऊन पोहोचला. मात्र पोलिसांनी त्याला आणि त्याच्यासोबत दोघांना चोरीच्या संशयावरुन तुरुंगात टाकले. मात्र त्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांना सगळी माहिती सांगितली आणि ते दोघं सुटले.
आता लॉटरी जिंकलेले कार्ड कोर्टात जमा झाले आहे. बेल्जियम मीडियानुसार, अल्जेरियन व्यक्तीने 4 महिन्यांपूर्वी आपला देश सोडला होता. तो बोटीने स्पेनला आला होता . त्यानंतर तो स्पेनहून फ्रान्समार्गे पायी बेल्जियमला पोहोचला.त्या व्यक्तीचे वकील अलेक्झांडर व्हर्स्ट्रेट म्हणाले की, लॉटरी कंपनी बक्षिसाची रक्कम देऊ शकत नाही, कारण त्याचे बॅकेत खाते नाही. मात्र, बक्षीसाची रक्कम मिळेपर्यंत त्या व्यक्तीला कुठेही पाठविण्यात येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अलेक्झांडरने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की. आम्ही अशा कागदपत्रांचा शोध घेत आहोत ज्यावरून त्या व्यक्तीची ओळख उघड होऊ शकेल. त्याला अल्जेरियातील त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधावा लागेल. त्याच वेळी, लॉटरीच्या प्रवक्त्याने एएफपीला स्पष्टपणे सांगितले नाही की, कोणत्या दस्तऐवजाच्या आधारावर ती व्यक्ती जिंकलेली रक्कम मिळवू शकते.



























































