
सामना प्रतिनिधी, मुंबई
जगातील सर्वात उत्तुंग शिखर असलेले एव्हरेस्ट सर करण्यासाठी आता आदिवासी विद्यार्थी सरसावले आहेत. धैर्य, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्रातील शासकीय आणि अनुदानित आदिवासी आश्रम शाळांमधील 11 आदिवासी विद्यार्थी हे शिखर सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मिशन शौर्य अंतर्गत राबवण्यात येणाऱया या मोहिमेचा शुभारंभ नुकताच सहय़ाद्री अतिथीगृहात पार पडला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव मनीषा वर्मा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मिशन शौर्य 2019 च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
मिशन शौर्यची गरज का?
दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी मुळातच शारीरिक आणि मानसिकरीत्या खंबीर असतात. त्यामुळे या 11 आदिवासी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध प्रशिक्षणाची जोड देत त्यांच्यात नेतृत्वगुण रुजवून भविष्यात देशासाठी आदर्श संघटक घडावेत, यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे मिशन शौर्य मोहीम राबवली जात आहे.
दुसऱ्या पर्वात 11 विद्यार्थ्यांची निवड
गेल्या वर्षी राज्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. या वर्षी दुसऱ्या पर्वात मेळघाट, पालघर, धुळे, पांढरकवडा, नाशिक येथील आदिवासी पाड्यातील मुन्ना धिकार, शिवचरण भिलावेकर, सुग्रीव मंदे, सुषमा मोरे, अंतुबाई कोटनाके, सूरज आडे, मनोहर हिलीम, चंद्रकला गावित, हेमलता गायकवाड, केतन जाधव, अनिल कुंदे या विद्यार्थ्यांची निवड एव्हरेस्टसाठी करण्यात आली आहे.
खडतर प्रशिक्षण
वर्धा येथे ज्ञानभारती स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये 203 विद्यार्थ्यांना मूलभूत प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर त्यातून 132 विद्यार्थ्यांना हैदराबाद येथील भोंगीर येथे रॅपलिंग आणि रॉक क्लायम्बिंगच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यातून उत्कृष्ट ठरलेल्या 41 जणांची निवड दार्जिलिंगमधील हिमालयन माऊंटनरिंग इन्स्टिटय़ूटसाठी करण्यात आली. तिथे पुन्हा 30 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यातून उत्कृष्ट 18 विद्यार्थ्यांना लेहमध्ये उणे 35 अंश तापमानात खडतर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाअंती केवळ 11 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
























































