
महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचा मुक्काम असलेल्या गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर आज तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पूरस्थितीमुळे लोकांना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागत असतानाही आसाममधील भाजप सरकार मात्र महाराष्ट्रातील आमदारांची बडदास्त ठेवण्यात व्यस्त आहे, असा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे.
आसाम तृणमूल काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर आसाम सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने केली. आसाममधील भाजप सरकार महाराष्ट्रातील आमदारांवर कोटय़वधी रुपये खर्च करत आहे. रॅडिसनमध्ये आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे. त्यांच्यावर जनतेचा पैसा उधळण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. आसामच्या नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारने वाऱयावर सोडले, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

























































