टीआरपी घोटाळा- रिपब्लिकचा सहभाग नसल्याचा अर्णबचा दावा, BARCच्या खुलाशाने खोटारडेपणा उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी घोटाळ्यात आपल्या वाहिनीचं नाव नव्हतं असा दावा करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांनी केला होता. तो दावा खोटा असल्याचा खुलासा BARCने केला आहे.

काही दिवसांपूर्वी भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल (BARC)च्या अंतर्गत काम करणाऱ्या हंसा रिसर्च या संस्थेने टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. त्या अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक भारत, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा अशा तीन वाहिन्यांचा समावेश होता. त्याविरोधात या वाहिनीच्या मालकांसह अन्य काही जणांवर कारवाई करण्यात आली. तसंच अर्णब गोस्वामी यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. याच टीआरपी घोटाळ्यासंबंधित एक कार्यक्रम रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीवर घेण्यात आला होता. या कार्यक्रमात अर्णब गोस्वामी यांनी BARCने रिपब्लिक टीव्हीला पाठवलेल्या एका ईमेलचा उल्लेख केला. या ईमेलच्या आधारे अर्णब यांनी टीआरपी घोटाळ्यात रिपब्लिकचं नाव नसल्याचा दावा केला.

या दाव्याला खोटं ठरवणारं एक ट्वीट BARCने केलं आहे. त्यांच्या ट्वीटनुसार, BARCने तपास सुरू असलेल्या या प्रकरणाविषयी कोणतंही विधान केलेलं नाही. तसंच तपास यंत्रणांना जरूर असलेली माहिती देण्यात येत आहे. BARC ही संस्था रिपब्लिक नेटवर्कच्या अशा प्रकारच्या वर्तनावर अत्यंत नाराज आहे. ईमेलमध्ये असा कोणताही उल्लेख केलेला नाही. अशा खासगी संभाषणांचे चुकीचे अर्थ काढून ते सार्वजनिकरित्या जाहीर करण्याच्या या कृतीमुळे ही संस्था रिपब्लिक नेटवर्कवर नाराज आहे, असं ट्वीट BARCने केलं आहे.

BARC च्या अंतर्गत काम करणाऱ्या हंसा रिसर्च या संस्थेला टीआरपीमध्ये काहीतरी घोळ आहे हे जेव्हा निदर्शनास आले तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि मोठा घोटाळा समोर आला. हंसा कंपनीचे काही कर्मचारी हे पदाचा गैरवापर करून गोपनीय माहिती विविध टेलीव्हिजनला देत होते अशी बाब तपासात समोर आली. तसंच, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी 1 लाख बनावट खात्यांचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. सायबर एक्सपर्टच्या मदतीने पोलिसांनी बॉट्स मशीनची माहिती मिळवली आहे. बॉट्स मशीनच्या मदतीने फॉलोअर वाढवले जातात. फॉलोअर्स वाढवणाऱ्या 50 बॉट्स मशीन, आयपी अॅड्रेसची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी सध्या तपास सुरू असून तीन वाहिन्यांची नावं यात गुंतल्याचं उघड झालं आहे.