मध्यरात्री हॉटेलमध्ये घुसला ट्रक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । येवला

येवला शहरातील फत्ते बुरूज नाक्यावर मध्यरात्री २ च्या सुमारास एक ट्रक दुसऱ्या ट्रकला धडक देऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या राजेंद्र रामदास सोनवणे यांच्या साई तेज हॉटेलमध्ये घुसला. या दुर्घटनेमध्ये हॉटेल मालक राजेंद्र सोनवणे बाल बाल बचावले, ते हॉटेलमध्ये झोपलेले होते. हॉटेलमधील दोन मोठे फ्रिज, काऊंटर, टेबल सामान असे चार लाखाहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले.

अपघातानंतर ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य विद्युत वाहीनेचा खांब तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला. यामुळे विजतारा तुटल्याने निम्मे शहर अंधारात होते. सदर ट्रकचा ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार असून क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी ही घटना झाल्याने मोठी दुर्घटना टळाली.

या घटनेत मुख्य विद्युत पोल तुटल्याने निम्म्या शहरातील खंडीत विज पुरवठ्याने पैठणी कारागिरांना काम बंद ठेवावे लागले. तर बीएसएनएलचा एक पोल व १०० फुट ओएफसी केबल तुटली. त्यामुळे इंटरनेट सुविधा बंद पडली. तसेच गंगा दरवाजा परिसरातील चार बँकाना जनरेटरचा वापर करून कामकाज करावे लागले. नेट नसल्याने कामकाज विस्कळीत झाले. संध्याकाळ पर्यंत पोल दुरुस्तीचे काम सुरू होते.