कश्मीरमध्ये राजस्थानी ट्रकचालकाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमध्ये 72 दिवसांनंतर पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू झाल्यावर जनजीवन सुरळीत होत असतानाच दहशतवाद्यांनी सोमवारी शोपिया जिल्हय़ातील सफरचंद घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचालकाची गोळय़ा झाडून हत्या केली. यातील एक हल्लेखोर हा पाकिस्तानी तर अन्य दोघे जण कश्मिरी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांकडून शोधमोहीम सुरू आहे. त्याचदरम्यान, दहशतवाद्यांनी एका सफरचंदाच्या बाग मालकालाही मारहाण केली.

शरीफ खान हा राजस्थानचा असून तो सफरचंदाच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. शोपिया जिल्हय़ातील शीरमल गावात सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळय़ा झाडल्या. त्याचा जागेवर मृत्यू झाला. कश्मीर खोऱ्यात केंद्र सरकार निर्बंध शिथिल करत असल्यामुळे दिवसेंदिवस जनजीवन पूर्ववत होत आहेत. यात व्यापारी, स्थानिक दुकानदार, पर्यटन व्यवसाय आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत होत आहे. यामुळे संतापलेल्या दहशतवाद्यांनी आता सफरचंद बाग मालकांना आणि त्याची ने-आण करणाऱ्या ट्रकचालकांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.