
कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील कौलव (ता. राधानगरी) येथील दत्त मंदिराजवळ दुपारी 12 वा. ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तरसंबळे येथील बहीण-भावासह अडीच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. या अपघातात आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. श्रीकांत बाबासाहेब कांबळे (वय 30, रा. तरसंबळे, ता. राधानगरी), बहीण दिपाली गुरुनाथ कांबळे (वय 25, रा. शेंडूर, ता. कागल), कौशिकी कांबळे (वय अडीच वर्षे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अथर्व सचिन कांबळे (वय 8) हा गंभीर जखमी झाला आहे.
राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथील श्रीकांत कांबळे व त्यांची बहीण दिपाली कांबळे हे दोघे भोगावती येथून दुचाकीने तरसंबळेकडे निघाले होते. कौलव येथील दत्त मंदिराजवळ समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यामध्ये श्रीकांत कांबळे आणि त्यांची अडीच वर्षांची पुतणी कौशिकी यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिपाली कांबळे यांचा रस्त्यात उपचाराअभावी मृत्यू झाला. अपघातात अथर्व सचिन कांबळे (वय 8) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत श्रीकांत हे पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत होते. दिपाली कांबळे यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या भावाकडे राहात होत्या. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.