
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिजा शुल्क वाढीच्या निर्णयाने अमेरिका आणि हिंदुस्थान यांच्यातील विमान वाहतुकीत मोठा गोंधळ उडाला आहे. या निर्णयामुळे हिंदुस्थानहून अमेरिकेला जाणाऱ्या विमान भाड्यात अचानक दुप्पट वाढ झाली असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिजा शुल्क १ लाख डॉलर (सुमारे ८८.१० लाख रुपये) इतकी वाढवण्याची घोषणा केली असून, ही वाढ २१ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. या व्हिजाच्या माध्यमातून अमेरिकेत काम करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा किंवा पुन्हा अमेरिकेत परतताना कंपन्यांना हे शुल्क भरावे लागेल. हिंदुस्थानमधून ७० टक्के H-1B व्हिजा धारक असल्याने, हा निर्णय विशेषतः हिंदुस्थानी तंत्रज्ञान कंपन्या आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्का आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयानंतर अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि जेपी मॉर्गनसह अनेक टेक कंपन्यांनी हिंदुस्थानात किंवा इतरत्र देशात असलेल्या कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत परतण्यास सांगितले आहे. सध्या परदेशात असलेल्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब अमेरिकेत परतण्यास सांगण्यात आले आहे. एच-१बी व्हिसा धारकांपैकी हिंदुस्थानी नागरिकांची संख्या अंदाजे ७० टक्के आहे, त्यामुळे या निर्णयाचा त्यांच्यावर मोठा परिणाम होईल.