America Attack On Venezuela – अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला; राष्ट्राध्यक्षांना केली अटक, ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून त्यांचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया अडेला आता अमेरिकन सैन्याच्या ताब्यात आहेत आणि त्यांना व्हेनेझुएलातून बाहेर काढण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटले की, “अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना व्हेनेझुएलाबाहेर नेले आहे. ही कारवाई अमेरिकी कायदा अंमलबजावणी संस्थांच्या सहकार्याने करण्यात आली. अधिक तपशील लवकरच जाहीर करू.”

या हल्ल्यात व्हेनेझुएलाच्या राजधानी काराकास आणि इतर भागांत किमान सात मोठे स्फोट करण्यात आले. स्थानिक वेळेनुसार रात्री २ वाजता हवाई हल्ले करण्यात आले. हल्ल्यानंतर फोर्टे तिउना आणि ला कार्लोटा या प्रमुख लष्करी तळांजवळ धुराचे लोट दिसले. शहराच्या काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

व्हेनेझुएलाच्या संरक्षणमंत्र्यांनी या हल्ल्याची निंदा करत म्हटले की, अमेरिकेने लष्करी आणि नागरी भागांवर हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली असून, लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. उपराष्ट्रपती डेल्सी रोड्रिगेज यांनी अमेरिकेकडे मादुरो दांपत्याच्या जीविताची पुरावा मागितला आहे.