ट्रम्प टॅरिफचा ऑटोमोबाईल सेक्टरला जबर फटका, 61 हजार कोटींचा व्यापार धोक्यात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेचा सर्वात जास्त फटका ऑटोमोबाईल सेक्टरला बसण्याची भीती वर्तवली जात आहे. याआधी ऑटोमोबाईल सेक्टरवर 25 टक्के आणि नंतर 25 टक्के असा एकूण 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. या धोरणाचा सर्वात जास्त परिणाम ऑटो पार्टस् एक्सपोर्टस्वर पाहायला मिळणार आहे. अमेरिका हिंदुस्थानी ऑटो कंपोनेंट्सची एक मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी वार्षिक जवळपास 7 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 61 हजार कोटी रुपयांचे पार्टस् निर्यात केले जातात, परंतु 50 टक्के टॅरिफमुळे ही निर्यात थेट अर्ध्यावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हिंदुस्थान रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करत आहे. तसेच हे तेल नंतर चढ्या भावात विकत आहे, असा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर केला आहे. त्यामुळेच हिंदुस्थानवरचा टॅरिफ दुप्पट केला आहे. जर हिंदुस्थानने आपल्या धोरणात बदल केला नाही, तर भविष्यात आणखी कठोर पावले उचलली जातील, अशी धमकी ट्रम्प यांनी हिंदुस्थानला दिली आहे. ट्रम्प यांच्या धमकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप उघडपणे प्रत्युत्तर दिले नाही.

27 ऑगस्टपासून नवा टॅरिफ

नवीन टॅरिफ हा येत्या 27 ऑगस्ट 2025 पासून लागू केला जाईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. हिंदुस्थानातून अमेरिकेत निर्यात केले जाणारे ऑटो पार्टस् आणि अन्य उत्पादनांवर 50 टक्के आयात शुल्क आकारले जाईल. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे कंपन्यांच्या कमाईवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे कंपन्यांना कर्मचारी कपातसुद्धा करावी लागेल, असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.