
सामना प्रतिनिधी । ठाणे
साद फाउंडेशन ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट यांच्या प्रयत्नाने रोटरी अंबर भवन येथे ठाणे जिल्ह्यातील सामाजिक संस्था व ट्रस्ट यांच्यासाठी शनिवारी “विश्वस्त दिन” निमित्ताने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत संस्था नोंदणी कायद्यात झालेले बदल व नोंदणी प्रक्रिया, संस्थांचे अहवाल लेखन, संस्थांमध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदल प्रक्रिया आणि त्यांचे अहवाल, दस्तऐवज नोंदणी व संस्थेचा लेखाजोगा त्याच बरोबर विश्वस्त व कार्यकारी मंडळाच्या जबाबदाऱ्या या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यालयातर्फे अधीक्षक कोकणे यांनी सामाजिक संस्थांची नियमावली व घटनेत होणारे बदल, घटनेचे महत्व, संस्थेचे बदल अहवाल करण्याच्या प्रक्रीये बद्दल माहिती दिली. निरीक्षक उंबरे यांनी सामाजिक संस्थेची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, संस्थेची हिशोब तपासणी या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
उपस्थित विस्वस्तांच्या (ट्रस्टी) प्रश्नांवर धर्मादाय उप आयुक्त श्रीमती उ. स. बाबर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती सं. सा. वनकोरे यांनी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
साद फाऊंडेशनच्या अध्यक्ष अॅड. पल्लवी यांनी ‘संस्थाचे बळकटीकरण’ या संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना मांडली. या संकल्पेनेच्या माध्यमातून संस्था बळकट होण्याच्या दृष्टीने नियोजन व कृती आराखड्याची मांडणी केली. सामाजिक संस्था व शासन मिळून सामाजिक बदलाची भविष्यकालीन प्रक्रियेची सुरवात या कार्यशाळेच्या निमित्ताने झाली. या प्रक्रियेला उपस्थित विश्वस्तांनी उत्तम प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय ठाणे विभागाच्या धर्मादाय उप आयुक्त श्रीमती उ. स. बाबर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती सं. सा. वनकोरे, अधीक्षक श्री प्र. वि. कोकणे, निरीक्षक अ. त्रि. उंबरे आणि सौ. रावळ या उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट व साद फाऊंडेशन चे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यातील ४८ संस्थांचे विशवस्त उपस्थित होते.

































































