
राधानगरी तालुक्यातील तुळशी आणि केळोशी लोंढा धरण परिसरात पर्यटनाच्या नावाखाली काही अतिउत्साही पर्यटक व हुल्लडबाज मद्यपींकडून राजरोसपणे ओल्या पार्ट्या होत आहेत. त्यातुन परिसरात होणारा कचरा व बाटल्यांचा खच यामुळे दोन्हीही जलाशय परिसराचे सौंदर्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अशी गैरकृत्य करणाऱ्या मद्यपीं आणि हुल्लडबाज पर्यटकांवर वनविभागाने कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
वनखात्याचे कर्मचारी जंगल तसेच तुळशी आणि केळोशी लोंढा धरण परिसराची काळजी घेत असतानाच, पर्यटनाच्या नावाखाली या परिसरात बिनधास्तपणे ओल्या पार्ट्या करून, निसर्गाची व पर्यावरणाची जाणीवपूर्वक हानी करण्याचा दुरुपयोग होत आहे.
धरणालगत जंगल क्षेत्रात चूली पेटवून जेवण करणे, मद्यपान करुन धिंगाणा घालणे, प्लॅस्टिकचा वारेमाप वापर करुन कचरा करणे, दारूच्या बाटल्या पाण्यात तसेच वनक्षेत्रात फोडून टाकणे अशा पर्यावरणास हानिकारक कृत्याचे प्रमाण गेल्या महिनाभरात वाढले होते. यासंदर्भात काही पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त करून मदतीची तयारी वनविभागाला दर्शविली होती.
या पार्श्वभूमीवर वनविभागाच्यावतीने म्हासुर्ली (ता.राधानगरी) चे परिमंडळ वन अधिकारी आर. एस. तिवडे यांनी कर्मचा-यांसह या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. सर्व कचरा एकत्र जमा करून वनक्षेत्राबाहेर पेटवून दिला. काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या पुनर्वापरासाठी भंगारात देण्यात आल्या. यापुढेही दररोज या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राशिवडे च्या वनरक्षक उमा जाधव, म्हासुर्लीचे वनरक्षक दिनेश टिपूगडे, केळोशीचे वनरक्षक भिवा यादव, शिवाजी कांबळे, संजय पानारी आदी कर्मचारी उपस्थित होते.

























































