तामिळनाडूत टीव्हीकेकडून सत्तास्थापनेचा दावा, थलपती विजयने घेतली राज्यपालांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळगा वेत्री कळघमचा प्रमुख आणि अभिनेता विजय यांनी बुधवारी राजभवनात तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेने राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मला टीव्हीकेकडून अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. त्यांच्याकडे बहुमत असून त्यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण करण्यात यावे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मी त्यांना भेटीची वेळ दिली असून आता राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असे एएनआयशी बोलताना राज्यपाल आर्लेकर म्हणाले.

दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेसाठी 118 या बहुमताच्या आकड्याची गरज आहे. टीव्हीकेने 108 जागा जिंकल्या असून काँग्रेसने 5 जागा जिंकल्या आहेत. बुधवारी दुपारीच काँग्रेसने आपल्या पाठिंब्याचे पत्र टीव्हीके प्रमुख विजय यांच्याकडे सोपवले होते. त्यानंतरही बहुमतासाठी 5 जागा कमी पडत आहेत. ही कसर भरून काढण्यासाठी विजय यांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस एडापड्डी के. पलानीस्वामी यांच्याशी संपर्क साधला आहे. अण्णा द्रमुककडे 47 जागा असून त्यांचा पाठिंबा मिळाल्यास विजय यांचे सरकार सहज बहुमताचा टप्पा पार करेल.

तामिळनाडूत कुणाला किती जागा?

टीव्हीके – 108
डीएमके – 59
एआयएडीएमके -47
काँग्रेस – 5
पीएमके – 4
आययूएमएल – 2
सीपीआय – 2
व्हीसीके – 2
भाजप – 1
डीकेडीके – 1
एएमएमकेएमएमकेझेड – 1