जादुटोणा करण्याची भीती दाखवून महिलेकडून उकळले 15 हजार, दोघांना अटक

414
crime

जादूटोणा करुन कुटूंब उध्वस्त करण्याची धमकी देउन सफाई कामगार महिलेकडून 15 हजार रुपये उकळणाऱ्या महिलेसह एका तृतीयपंथाला समर्थ पोलिसांनी अटक केली.

सुनिता पवळे उर्फ सोनी (वय 45, रा. नाना पेठ) आणि एक तृतीयपंथी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिता संदिप वाघेला (वय 38) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता सफाई कामगार असून पती आणि दोन मुलांसह डेक्कन परिसरात राहायला आहेत. नववीत शिकत असताना 2019 मध्ये अनिताच्या मुलाला एका मित्राने परिक्षेआधी पुâटलेली प्रश्नपत्रिका पुरविली होती. त्यामुळे कुटूंबाला माहिती न होता अनिता यांच्या मुलाने घरातील दागिने मित्राला दिले होते. त्याची माहिती अनिताला मिळाल्याने त्या चिंता करीत होत्या. त्यानंतर काही दिवसांनी समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत साफसफाई करीत असताना अनिताची ओळख सुनिताशी झाली. त्यावेळी सुनिताने मला देवी प्रसन्न आहे, मी जादूटोणा करुन तुझे दागिने मिळवून देते, असे सांगत अनिताकडून तीन हजार रुपये घेतले. त्यानंतर सुनिता एक महिनाभर दिसली नाही. पुन्हा त्यांनी अनिताला गाठून पौर्णिमेला देवीसाठी बकरा कापण्यासाठी पाच हजार रुपये मागितले. मात्र, अनिताने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे सुनिताने पैसे न दिल्यास तुझ्यावर देवीचा कोप होईल, जादूटोणा करुन तुझ्या कुटूंबाचे वाटोळे करील अशी धमकी दिली. त्यामुळे अनिताने पुन्हा सुनिताला पाच हजार रुपये दिले. असे करुन सुनिता आणि एका तृतीयपंथ्याने अनिताकडून वेळोवेळी पैसे उकळून 15 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर अनिताने समर्थ ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या