मॅजिक पेनची कमाल… धनादेशावर खाडाखोड आणि हवी तेवढी रक्कम टाकून फसवणूक; दोघांना अटक

बँकेकडुन कर्ज न मिळणार्‍या ग्राहकांना  आमच्या फायनान्स कंपनीकडून कर्ज देऊ, अशी बतावणी करीत कर्ज घेण्यासाठी इच्छुक नागरिकांकडून प्रोसेसिंग फिच्या नावाने धनादेश घ्यायचे. मग मॅजिक पेनच्या सहाय्याने धनादेशावरील रक्कमेत फेरफार करून संबंधित नागरिकांची फसवणूक करणार्‍या दोघा  भामट्यांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

जिगर कारेलिया (41) आणि आकाश विणकर (26) अशी त्या दोघा भामट्यांची नावे असून जिगर हा सराईत गुन्हेगार आहे. या दोघांनी विजय प्रजापती (47)या व्यावसायिकाला कर्ज देण्याच्या बहाण्याने त्यांनी दिलेल्या धनादेशावर मॅजिक पेनच्या सहाय्याने  कळणार नाही अशापद्धतीने खाडाखोड केली आणि धनादेशावर दोन लाखाची रक्कम टाकून विजय यांची फसवणूक केली होती.

याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनीट-8च्या पथकाने संमातर तपास सुरू केला होता. गुन्हा घडल्यापासुन दोघे भामटे पसार झाले होते. अखेर प्रभारी निरीक्षक लक्ष्मीकांत सांळुखे, सपोनि मधुकर धुतराज, प्रभू, पाटील तसेच कुरकुटे, गायकवाड, भिताडे, बिडवे या पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबर्‍यांच्या मदतीने कसून तपास करीत नागरिकांची मॅजिक पेनच्या सहाय्याने लाखोंची फसवणूक करणार्‍या  जिगरला कांदिवलीतून तर आकाशला बोरिवलीच्या काजूपाड्यातून उचलले.

फायनान्स कंपनीच्या नावाने झोल

 जिगर विविध बँकेत जाऊन तेथील कर्जाचा व्यवहार बघणार्‍या अधिकार्‍याला भेटतो. मग कर्ज घ्यायचे असल्याचे सांगून संबंधिताचा मोबाईल नंबर घेतो. दुसर्‍या दिवशी त्या अधिकार्‍याला संपर्क करून मी फायनान्स कंपनी सुरू केलीय. बँकेकडून कोणाला कर्ज मिळत नसेल अशांना आमच्याकडे पाठविण्यास सांगत. या मोबदल्यात चार टक्के लाभांश देईन असे आमिष दाखवत असे.

मग मॅजिक पेनची कमाल

कर्ज घेण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना मग जिगर संपर्क साधायचा. त्यांच्याकडून विविध कागदपत्र मागून मग प्रोसेसिंग फिच्या नावाने दोन धनादेश घ्यायचा. एका धनादेशावर 400 रुपयांची रक्कम टाकून घ्यायचा. मग त्या धनादेशावर मॅजिक पेनाच्या सहाय्याने  खाडाखोड करून आपल्याल्या हवी ती रक्कम टाकून फसवणूक करायचा. या कामात मदत करणार्‍या आकाशला तो 10 टक्के  लाभांश द्यायचा. अशाप्रकारचे जिगरवर सात गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे.