
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना क्राईम ब्रँचच्या युनिट 10 ने अटक केली. सुनील श्रीपाद कुलकर्णी आणि अन्वर शेख अशी त्या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी 6 किलो व्हेल माशाची उलटी जप्त केली. जप्त केलेल्या उलटीची किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे.
व्हेल माशाच्या उलटीला तरंगते सोनेदेखील बोलले जाते. त्या उलटीचा वापर उच्च प्रतीची औषधे आणि सुंगधित अत्तर बनवण्यासाठी होतो. हिंदुस्थानात व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीस बंदी आहे. दुबई आणि आखाती देशांत व्हेल माशाच्या उलटीला मागणी असल्याने त्याची तस्करी केली जाते. व्हेल माशाची उलटी घेऊन दोन जण पवई येथे येणार असल्याची माहिती युनिट 10 चे पोलीस हवालदार सतीश कांबळे याना मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक महेश ठाकूर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक किरण लोंढे, सहायक निरीक्षक वाहिद पठाण, धनराज चौधरी, रवींद्र माने यांनी तपास सुरू केला. वन अधिकारी शरण देशपांडे, मरीन बायोलॉजिस्ट हर्षल कर्वे यांची पोलिसांनी मदत घेतली. शुक्रवारी सायंकाळी सुनील आणि अन्वर हे दोघे पवई परिसरात आले. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कर्ज फेडण्यासाठी केली तस्करी
सुनील हा मूळचा सोलापूरचा असून तो बांधकाम क्षेत्रात असून पुण्यात राहतो. अन्वर हा नवी मुंबईमध्ये बांधकामाचे कंत्राट घेतो. त्या दोघांना पैशांची गरज असल्याने त्याने व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा मार्ग स्वीकारला. उलटी विकल्यावर त्या दोघांना 30 टक्के रक्कम मिळणार होती. ती उलटी कर्नाटक येथील एका व्यक्तीने दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.





























































