राहुरीत दरोडय़ाच्या तयारीतील दोघांना अटक; तिघे फरार

दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या टोळीचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, दोनजणांना अटक करण्यात यश आले आहे. तर, अंधाराचा फायदा घेत त्यांचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. राहुरी तालुक्यातील सडे शिवारात मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

अर्जुन लहू मोरे (वय 21), नामदेव गोरख बर्डे (वय 35, रा. महादेव वाडी, सडे, ता. राहुरी) अशी अटक केलेल्यांची नावे असून, गोरक्ष सूर्यभान निकम याच्यासह तिघे फरार झाले आहेत. हवालदार अमोल पडोळे यांनी फिर्याद दिली आहे.

काही संशयित दरोडय़ाच्या तयारीत असल्याची खबर राहुरीचे पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचा सुगावा लागताच गोरक्ष निकम याच्यासह दोनजण पसार झाले. तर, अर्जुन मोरे आणि नामदेव बर्डे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चाकू, लोखंडी गज, रस्सी, मिरचीपूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे तपास करीत आहेत.

पोलीस उपनिरीक्षक नारेडा, हवालदार एकनाथ आव्हाड, अमोल पडोळे, आजिनाथ पाखरे, अमित राठोड, चालक जालिंदर साखरे या पथकाने ही कारवाई केली.