मोहोळमध्ये एका रात्रीत दोन एटीएम फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोहोळ तालुक्यात एकाच रात्रीत एटीएम फोडण्याच्या तीन घटना घडल्या असून, एटीएममधील 49 लाख 28 हजार रुपयांची रोकड या चोरटय़ांनी लंपास केली आहे. मोहोळ पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेले एक, तर तालुक्यातील कुरुल येथील एक एटीएम फोडण्यात आले आहे. दरम्यान, चोरटय़ांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱयांवर रंगाचा स्पे मारून गॅस कटरच्या साहाय्याने ही चोरी केली आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोहोळ शहरालगत असलेल्या लोकसेवा हॉटेलजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. मंगळवारी रात्री चार चोरटय़ांनी तोंडाला रुमाल बांधून एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱयावर हिरव्या रंगाचा प्रे करून कॅमेरा बंद केला. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने अवघ्या 15 मिनिटांत एटीएम मशिन फोडून त्यातील 26 लाख 28 हजार 500 रुपये लंपास केले. हिताची पेमेंट सर्व्हिस या कंपनीचे ईश्वर म्हेत्रे यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी किरण लांडगे यांना चोरीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर चोरटय़ांनी कुरुल येथील एटीएम मशिन फोडून यातील 22 लाख 99 हजार रुपये चोरून नेले आहेत. याप्रकरणी एटीएम मशिनचे रिजनल मॅनेजर अमोल पवार यांनी कामती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या चोऱयांचा तपास मोहोळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर खारगे, तर कामतीचे पोलीस अधिकारी अंकुश माने करीत आहेत.

आयडीबीआय बँकेचे एटीएम वाचले
चोरटय़ांनी मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱयावर हिरवा रंगाचा स्प्रे मारला; परंतु तेथे नागरिक येऊ लागल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे या एटीएममधील रक्कम सुरक्षित राहिली आहे.