कुर्ल्यातील दोन पादचारी पूल पावसाळय़ापूर्वी पाडणार; दुरुस्ती अशक्य असल्याने मध्य रेल्वेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

‘हिमालय’ पुलाच्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या मध्य रेल्वेने कुर्ला रेल्वे स्थानकातील दोन पादचारी पूल तडकाफडकी बंद केल्याने गोंधळ उडाला होता, मात्र त्यात कल्याण दिशेकडील रेल्वेचा पादचारी पूल आणि पूर्व ते पश्चिमेला जोडणारा पालिकेचा पब्लिक ‘एफओबी’ बंद केल्याने पर्यायी पुलांवरचा भार वाढला. त्यामुळे हार्बर मार्गाला जोडणारे मध्य रेल्वेचे कुर्ला स्थानक संवेदनशील ठरले असतानाच हे पादचारी पूल केवळ दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले नसून त्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पाडण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. त्यामुळे सर्वाधिक गर्दीच्या या स्थानकावर प्रवाशांची गर्दी आवरण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपीची कसोटी लागणार आहे.

‘हिमालय’ पुलाच्या दुर्घटनेतून धडा घेतलेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने एकापाठोपाठ एक मध्य रेल्वेचे पाच पादचारी पूल पाडण्याचे नियोजन केले होते, मात्र कुर्ला येथील पूर्व-पश्चिम जाणारा आणि कोणत्याही फलाटाला न जोडलेला पब्लिक एफओबी मंगळवारी दुपारी अचानक बंद करण्यात येऊन पूर्व ते पश्चिम जाणाऱ्या प्रवाशांना भुयारी मार्गातून जाण्यासाठी भाग पाडण्यात आले. त्यामुळे आधीच कल्याण दिशेकडील पादचारी पूल बंद झाल्याने पर्यायी पुलांवर गर्दी होत असताना आणखीनच गोंधळ उडाला आहे. आता हे दोन्ही पूल पावसाळ्यापूर्वीच पाडण्याची तयारी मध्य रेल्वेने केली आहे.

कुर्ला स्थानकातील कल्याण दिशेचा रेल्वेचा पादचारी पूल, दुसरा पालिकेचा कोणत्याही फलाटाला न जोडलेला परंतु कुर्ला पूर्व ते पश्चिम जाण्यासाठी सर्रास वापरला जाणारा पादचारी पूल अचानक बंद करण्याची नोटीस मंगळवारी लावण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड कोंडी झाली आहे. मध्य रेल्वेने हे दोन्ही पूल पावसाळ्यापूर्वीच पाडण्याचे ठरविले आहे. पूर्व ते पश्चिम पुलासाठी पर्याय म्हणून सब वे बांधला असल्याने तो पाडण्याचे आधीच ठरल्याचे मध्य रेल्वेच्या इंजिनीअरिंग विभागाचे म्हणणे आहे, तर कल्याण दिशेचा पादचारी पूल दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेला असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पुलांच्या देखभालीचे धोरणच नाही…

कुर्ला पूर्व ते पश्चिम जाण्यासाठी पर्याय म्हणून आधीच ‘सब वे’ बांधण्यात आला. ज्या पादचारी पुलांची दुरुस्ती करण्याची शक्यता मावळली आहे असे पूल हटविण्यात येणार असून हे पादचारी पूल जुने असून त्यांची देखभाल करण्याचे निश्चित धोरण नसल्याने गोंधळ उडाल्याचे म्हटले जात आहे.

हे पूल पाडणार

  • कुर्ला स्टेशनचा कल्याण दिशेकडील पूल
  • भांडुप स्टेशनचा कल्याण दिशेकडील पूल
  • दिवा स्टेशनचा सीएसटी दिशेचा पूल
  • विक्रोळीतील सीएसटी दिशेकडील पूल
  • शिवडीतील पादचारी पूल