रक्षाबंधनाच्या सणाला गालबोट लावणारी घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. मोशी परिसरात सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास इंद्रायणीत तीन मुले बुडाली. बुडालेली मुलं वेदश्री तपोवन या संस्थेत वेदांचे शिक्षण घेत होती. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एक मुलास बाहेर काढल्यानंतर उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला. अद्याप तिसऱ्या मुलाचा शोध सुरु आहे.
श्रावण निमित्त नदी पूजन विधीसाठी डुडुळगाव येथील नदीकाठावर मुले गेली होती. सर्वजण 12 ते 16 या वयोगटातील आहेत. नदीमध्ये उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी वाहत जात असताना त्यांना वाचवण्यासाठी जय दायमा या विद्यार्थ्यांने नदीमध्ये उडी घेतली. मात्र त्याला वाचवण्यात यश आले. परंतु उपचार दरम्यान त्याचे निधन झाले. नदी पात्रातून दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून ओंकार पाठक असे त्याचे नाव आहे.तिसरा विद्यार्थी प्रणव पोतदार याचा शोध कार्य चालू आहे.
आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दल, दिघी पोलीस स्टेशन, आळंदी पोलीस स्टेशन येथील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिकांकडून शोधकार्य सुरु आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी भेट देत पाहणी केली.