
जहाजावर कंटेनर भरण्याचे काम सुरू असताना दोन कंटेनर समुद्रात पडल्याची घटना जेएनपीटीत घडली आहे. काही वेळाने हे कंटेनर पुन्हा जहाजावर चढविण्यात आले. मात्र, यामुळे जेएनपीटीच्या ऑपरेटींग पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जेएनपीटीत व्हॅनाई-501 या जहाजावर कंटेनर भरण्याचे काम सुरू असताना 40 फुटाचे दोन रिकामे कंटेनर समुद्रात पडल्याची घटना घडली. जहाजातील कर्मचाऱ्यांनी जहाजातील कंटेनर लॉक केले नसल्याने हॅच कव्हर उचलताना कव्हरचा धक्का लागून हा अपघात घडला. सुदैवाने हे कंटेनर रिकामे असल्याने अर्थिक नुकसान झाले नाही. तसेच कंटेनर रिकामे असल्याने बऱ्याच वेळ समुद्रात तरंगत होते. त्यामुळे ते बाहेर काढणे सोपे गेले. जहाजातून कंटेनर समुद्रात पडण्याबाबत चौकशी केली जाईल असे जेएनपीटीच्या सूत्रांनी सांगितले.
























































