
एका मनी ट्रान्सफर कंपनीची फ्रँचायसी घेऊन त्याच कंपनीच्या दोन कोटींवर डल्ला मारणाऱ्या भामटय़ाला मध्य सायबर पोलिसांनी पकडले आहे. या गुन्ह्यात रोहित राठोड या मुख्य आरोपीला सहकार्य करणाऱ्या अन्य दोघांनासुद्धा बेडय़ा ठोकण्यात आल्या.
दहिसर येथे राहणाऱ्या रोहित राठोड याने एका मनी ट्रान्सफर करणाऱ्या कंपनीची फ्रँचायजी घेतली होती. त्यानंतर रोहितने शिताफीने कंपनीचा सर्व्हर हॅक केला. पण एकदाच मोठा झोल न करता रोहितने हळूहळू करत वर्षभरात तब्बल दोन कोटी दहा लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर वळते केले. मग संबंधित बँक खाते धारकाला त्याचे कमिशन देत उर्वरित रक्कम स्वतःसाठी काढून घ्यायचा. अगदी गुपचूप रोहितचे हे काम चालू होते.
जवळपास तीन हजार ट्रान्झेक्शन करून रोहितने दोन कोटी दहा लाख वळते करून घेतले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांना बॅलेंसशिट तपासत असताना 70 हजार परस्पर भलत्याच बँक खात्यांवर वळते झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली असता वर्षभरात हळूहळू करून मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यानंतर कंपनीकडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून मध्य सायबर विभाग पोलिसांनी तपास सुरू केला असता कंपनीची फ्रँचायसी घेणाऱ्या रोहित राठोड याने हा कारनामा केला असल्याचे निष्पन्न होताच याच्यासह त्याला मदत करणारे रफिक पायक आणि समशाद खान अशा तिघांना पकडण्यात आले.
गफला करण्यासाठी दुसऱ्यांच्या बँक खात्याचा वापर
रोहित हा कंपनीचे सर्व्हर हॅक करून पाच-दहा हजार रुपये रफिक, समशाद तसेच आणखी सात ते दहा जणांच्या बँक खात्यांवर वळते करायचा. मग संबंधित बँक खातेधारकांच्या एटीएम कार्डचा वापर करत पैसे काढून घ्यायचा. रोहित आणि आणखी एकाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून अटकेत असलेल्या तिसऱ्या आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, रोहितने याआधीदेखील अशा प्रकारचा गुन्हा केला असून मालाड पोलीस ठाण्यात त्याची नोंद आहे.


























































