
सामना ऑनलाईन । मुंबई
भांडुप येथे विजेचा धक्का बसल्याने चिमुरडीसह एका तरुणाला शनिवार २ जून रोजी आपला जीव गमवावा लागला होता. महावितरणची केबल उघडय़ावर असल्यानेच हा अपघात घडला होता. या प्रकरणी महावितरणने चौकशी करून सहाय्यक अभियंत्यासह प्रधान तंत्रज्ञाला निलंबित केले आहे. कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. भांडुप पश्चिम येथे शनिवारी महावितरणचे अधिकारी विजेची केबल जोडण्याचे काम करत होते. त्याचवेळी अचानक आलेल्या पावसामुळे सदर काम अर्धवट स्थितीत होते. त्यामुळे तेथे खड्डय़ात पाणी साचले होते. त्यावेळी तेथून जात असलेल्या सारा खान व तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अनिल यादव या दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी केलेल्या चौकशीत अधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळेच अपघात झाल्याचे समोर आले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन सहाय्यक अभियंता केशव इंगोले, प्रधान तंत्रज्ञ प्रभाकर डोइफोडे यांना निलंबित केले आहे.

























































