झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, दोन मालगाड्यांची समोरासमोर टक्कर, कर्मचारी जखमी

झारखंडमध्ये शनिवारी रेल्वे अपघाताची भीषण घटना घडली. दोन मालगाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात मालगाडीवरील कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून अनेक डब्बे रुळावरून घसरले. या अपघातामुळे चांडिल-टाटानगर आणि चांडिल-बोकारो रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

चांडिलमध्ये दोन मालगाड्यांमध्ये झालेल्या अपघातामुळे टाटा-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस, टाटा-बक्सर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि टाटा-धनबाद स्वर्णरेखा एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुरुषोत्तम एक्सप्रेस आणि आनंद विहार एक्सप्रेस सह काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. घटनेची चौकशी करण्यासाठी रांची विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.