मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा; दगडफेक, तोडफोडीमुळे नगरमधील कापडबाजार परिसरात तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर येथील दाणेडबरा परिसरात लहान मुलांच्या क्रिकेट मॅचच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी गाडय़ांची तोडफोड होऊन परस्पर दगडफेक करण्यात आल्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेत दोन ते तीनजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस संजय पथक तत्काळ घटनास्थळी हजर झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.

दाणेडबरा परिसरात प्लॅस्टिक बॉलवरील क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा झाली होती. यावेळी परिसरातील दोन टीममध्ये मॅच सुरू असताना वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन दगडफेक व तोडफोडीमध्ये झाले. त्यामुळे परिसरात धावपळ सुरू झाली. या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन ते तीनजण जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे.

तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर, उपनिरीक्षक समाधान सोळंके, कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे आदीसह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली, तरी परिसरात तणावाचे वातावरण आहे.