वर्ल्डकप जिंकावाच लागेल; जय शहांचा रोहितसेनेला इशारा, द्रविडसोबत बंद दाराआड 2 तास चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडिज दौऱ्यातील टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींसह बीसीसीआयही नाराज आहे. यामुळे बीसीसीआय अलर्ट झाली असून आगामी वर्ल्डकप हलक्यात घेऊ नका. वर्ल्डकप दरम्यान बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराच रोहितसेनेला दिला आहे. ‘जनसत्ता’ने याबाबत वृत्त दिले आहे.

जय शहा खासगी कामानिमित्त अमेरिकेत गेले होते. याच दरम्यान त्यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत बंद दाराआड दोन तास चर्चा केली. यादरम्यान दोघांमध्ये हिंदुस्थानमध्ये होणाऱ्या आगामी वन डे वर्ल्डकपच्या रणनीतीवर चर्चा झाली. यावेळी जय शहा यांनी टीम इंडियाच्या कामगिरीवर नाराजीही व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्ल्डकप जिंकाच अशी गळ रोहितसेनेला घातली.

टीम इंडियाने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 सामने खेळले. यादरम्यान टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथेच जय शहा पोहोचले. हे कळताच राहुल द्रविडने स्वत:हून त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. चर्चेचा मुख्य रोख आशिया चषक आणि वन डे वर्ल्डकप असल्याची माहिती मिळतेय.

गंभीर-आफ्रिदी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; कधी, कुठे रंगणार सामना, वाचा सविस्तर…

राहुल द्रविड याचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळही 19 नोव्हेंबरला संपणार आहे. त्या अनुषंगानेही दोघांमध्ये चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे. आशिया चषक आणि वन डे वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते यावर राहुल द्रविडचे भवितव्य टिकून आहे. द्रविडकडेही ही शेवटची संधी असून देशाला आणखी एक आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्याची संधी त्याच्याकडे आहे.