
पुणे शहरातील मीनाताई ठाकरे वसाहतीजवळ संशयास्पद स्थितीत थांबलेल्या दोन अल्पवयीन दुचाकीस्वार चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन दुचाकी चोरल्याचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. स्वारगेट तपास पथकाकडून हद्दीत पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी मीनाताई ठाकरे वसाहतीजवळ दोन अल्पवयीन वाहनचोर थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी स्वारगेटमधून दोन आणि लष्कर परिसरातून एक अशा एकूण तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांच्या पथकाने केली.

























































