
सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरच्या किनाऱयावर आज एका संशयास्पद बोटीत शस्त्रास्त्रांचा साठा सापडला आणि अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. या बोटीत तीन एके 47 आणि 225 जिवंत काडतुसे सापडली. महाराष्ट्रात पुन्हा घातपात घडवण्याचा प्रयत्न तर नाही ना या भीतीने अवघ्या राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला. यंत्रणांचीही प्रचंड तारांबळ उडाली. परंतु ही बोट एका ऑस्ट्रेलियन दांपत्याच्या मालकीची असून ती ओमानच्या समुद्रातून भरकटत हरिहरेश्वरला पोहोचल्याची माहिती दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. त्यानंतर घातपातासाठी एके 47 रायफली आणल्याची भीती अखेर अफवाच ठरली आणि साऱयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हरिहरेश्वरच्या समुद्रात आज सकाळी 8 वाजता एक बोट हेलकावे खात होती. ते पाहण्यासाठी गावकऱयांनी किनाऱयावर गर्दी केली. त्यातील शिवसेनेचे विभागप्रमुख सचिन गुरव, सुयोग लांगी यांच्यासह काही ग्रामस्थांनी होडीतून जाऊन या बोटीची पाहणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला. बोटीत एक मोठा बॉक्स, तीन एके 47 रायफली आणि 225 जिवंत काडतुसे असल्याचे आढळले. त्यांनी तातडीने किनारा गाठून श्रीवर्धन पोलिसांना याची माहिती दिली. डीवायएसपी प्रशांत स्वामी यांच्यासह पोलीस फौजफाटा किनाऱयावर पोहोचला. रायगड पोलीस मुख्यालयालाही याची खबर देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ही बातमी वृत्तवाहिन्यांवर झळकली.
स्टीकर आणि कागदपत्रांवरून मालकिणीचा शोध लागला
दरम्यान रायगड पोलीस व तटरक्षक दलाने या बोटीतून हा शस्त्र साठा ताब्यात घेतला. त्यावेळी त्यांना या बोटीत छोटे कॉन्फरन्स टेबल व काही कागदपत्रेही सापडली. बोटीवर एक स्टीकरदेखील होता. त्यावर बोटीचे नाव ‘लेडीहान’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. कागदपत्रांनुसार ही बोट नेपच्यून सिक्युरिटी सर्व्हिसेसची असून त्याची नोंदणी ब्रिटनमध्ये झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर तटरक्षक दलाने त्या कागदपत्रावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या हाना लाँर्डरगन हिच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले. हानाचा पती जेम्स हॉबर्ट हा या बोटीचा कप्तान आहे. ही बोट मस्कतहून युरोपला जाणार होती. परंतु 26 जून रोजी सकाळी 10 वाजता या बोटीचे इंजिन निकामी झाले. बोटीवरील खलाशांनी मदतीचा कॉल दिला तेव्हा दुपारी 1 वाजता कोरियन युद्धनौकेने या बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. परंतु समुद्र खवळलेला असल्याने या लेडीहान बोटीचे टोइंग करता आले नाही आणि समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे ती भरकटत थेट हरिहरेश्वरच्या किनाऱयावर लागली, अशी माहिती कोस्टगार्डच्या अधिकाऱयांनी एक पत्रक जारी करून दिली.
बोटीने तिहेरी सुरक्षा कवच भेदले
शस्त्र असलेली ही बोट जवळपास 1800 किलोमीटर भरकटत आज हरिहरेश्वरच्या किनाऱयावर लागली. परंतु या घटनेने महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणेत मोठय़ा घोडचुका असल्याचेच समोर आले. नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलीस हे समुद्रात दिवसरात्र सातत्याने डोळय़ात तेल घालून गस्त घालत असतात. मात्र सुरक्षा यंत्रणांचे हे तिहेरी कवच भेदून ही बोट कोकण किनारपट्टीवर पोहोचलीच कशी, या तीन एजन्सीपैकी एकालाही ही बोट कशी दिसली नाही, असा सवाल विचारला जात आहे.
एटीएस करणार तपास
सध्यातरी या बोटीचा दहशतवाद्यांशी काही संबंध दिसत नसला तरी राज्य सरकार हाय अॅलर्टवर आहे. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करणार असून पथकाचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी घटनास्थळी जाऊन बोटीची पाहणी केली. बोटीत मिळालेली कागदपत्रे आणि आणखी काही वस्तू ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईसह राज्यभरात हायअलर्ट
तटरक्षक दल आणि सागरी पोलीसही घटनास्थळी पोहोचले. गोकुळाष्टमी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सापडलेल्या या शस्त्र्ासाठय़ांमुळे महाराष्ट्रात घातपात करण्याची दहशतवाद्यांची योजना तर नाही ना या शंकेने राज्यभरात हायअलर्ट जारी करण्यात आला. तर मुंबईत तातडीने नाकाबंदीही सुरू करण्यात आली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत साडेपाच तास अवघ्या महाराष्ट्रात घबराटीचे वातावरण होते. एटीएस प्रमुख विनित अग्रवाल हे त्यांच्या टीमसह तपासासाठी श्रीवर्धनला पोहोचले.
बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव लेडिहान असून ती एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची आहे. हाना लॉडर्सगन असे या ऑस्ट्रेलियन नागरिकाचे नाव असून ती एक महिला आहे. तिचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान आहेत. ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. मात्र बोटीचे इंजिन बिघडल्याने बोटीवरील सर्वांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. त्यामुळे ती बोट रायगडच्या समुद्रकिनाऱयावर आली, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
































































