साडेसहा लाखांचे वसूल केले 11 लाख 50 हजार, वेगवेगळ्या गुन्ह्यात दोन सावकारांना बेड्या

बेकायदेशिररित्या सावकारी करीत साडेसहा लाखांचे तब्बल 11 लाख 50 हजार वसूल करूनही आणखी पावणेदोन लाख रूपये मागणाऱ्या सावकारला खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली. त्याशिवाय साडेचार लाखांचे 8 लाख 48 हजार वसूल करीत आणखी साडेतीन लाख रूपये मागणाऱ्यालाही बेड्या घातल्या आहेत. दोन वेगवगेळ्या गुन्ह्यातील सावकारी करणाऱ्यांना अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

झहीर जुल्फीकार सय्यद (वय – 44, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराने अडचणीत असल्यामुळे झहीरकडून 5 लाख रूपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात झहीर प्रत्येक महिन्याला 40 हजारांची वसुल करीत होता. ऑगस्ट 2020 ते ऑगस्ट 2022 कालावधीत दोन वर्षांत आरोपीने त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 48 हजार वसुल केले. तरीही झहीर तक्रारदाराकडे आणखी साडेतीन लाखांची मागणी करीत होता. रक्कम न दिल्यास जिंवत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानुसार पथकाने त्याला अटक केली. एपीआय चांगदेव सजगणे तपास करीत आहेत.

दुसऱ्या गुन्ह्यात साडेसहा लाखांच्या बदल्यात तब्बल 11 लाख 50 हजार रूपये वसूल करूनही आणखी पावणेदोन लाखांची मागणी करणाऱ्या सावकाराला अटक केली. कासिब कदीर कुरेशी (वय – 33 रा. गाडीतळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराने कासिबकडून डिसेंबर 2020 मध्ये साडेसहा लाख रूपये व्याजाने घेतले होते. आरोपीने फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांच्याकडून 11 लाख 50 हजार रूपये वसूल केले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, एपीआय चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, विजय गुरव, सचिन अहिवळे, अमोल पिलाणे, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहूल उत्तरकर, संग्राम शिनगारे, किशोर बर्गे, चेतन शिरोळकर यांनी केली.

”आर्थिंक अडचणीत सापडलेल्या तक्रारदारांकडून अव्वाच्या सव्वा दराने बेकायदेशिररित्या वसुली करणाऱ्या दोघा सावकारांना अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे सावकारी करणाऱ्या संदर्भात नागरिकांनी तक्रार करावी.”

बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक दोन