
मिळकतीवर वारसदारांची नोंद करून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्कीकारताना कराड येथील भूमी अभिलेख कार्यालयामधील परीरक्षण भूमापक वैभव चंद्रकांत पाटील (रा. साई रेसिडेन्सी, मलकापूर, ता. कराड) आणि त्याचा खासगी मदतनीस श्रीधर संजय माने (रा, काघेरी, ता. कराड) हे दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
तक्रारदारांच्या चुलत काकांच्या शनिवार पेठ, कराड येथील मिळकतीवर वारसदारांची नोंद करून देण्यासाठी तक्रारदार यांना वैभव चंद्रकांत पाटील यांनी 13 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामध्ये तडजोड होऊन 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यांना त्यांचे खासगी मदतनीस श्रीधर संजय माने यांनी प्रोत्साहन दिले होते. याबाबतची तक्रार तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना वैभव चंद्रकांत पाटील हा परीरक्षण भूमापक जाळ्यामध्ये अलगद अडकला. यावेळी त्याच्यासोबत खासगी मदतनीस श्रीधर संजय माने हाही होता. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस हवालदार संजय साळुंखे, पोलीस नाईक प्रशांत ताटे, पोलीस कॉन्स्टेबल संजय काटकर, तुषार भोसले, नीलेश येवले सहभागी झाले होते.

























































