दोन पर्सेसिन नौका पकडल्या; बोटीतील मासळी गायब

कुणकेश्वर व आचरा समुद्रकिनारी अनधिकृत क्षेत्रामध्ये मासेमारी करताना रत्नागिरी येथील दोन पर्सेसिन नौका पकडण्यात आल्या आहेत. मालवण परवाना अधिकारी भालेकर यांनी देवगड बंदरामध्ये दोन्ही बोटी आणून देवगड मत्स्य विभागाच्या ताब्यामध्ये पुढील कारवाईसाठी दिल्या आहेत. मात्र दोन्ही बोटींवर मासळी आढळली नाही.

काही दिवसांपूर्वी देवगड बंदरामध्ये पकडलेल्या नौकांवरतीही मासळी आढळली नव्हती. या नौकांवरची मासळी कुठे गायब होते असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पकडलेल्या नौकांवरील मासळीच्या पाचपट दंड आकारला जातो. त्यामुळेच या बोटी ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती संशयही व्यक्त केला जात आहे.

आचरा समुद्रकिनारी रत्नागिरीतील अल करीम-2 ही पर्सेसीन नौका अनधिकृत क्षेत्रामध्ये मासेमारी करीत असताना मालवण मत्स्य व्यवसाय अधिकारी भालेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही नौका पकडून व पर्सेसीन नौकेचे मालक फतन बानू परी मुकादम (रत्नागिरी) यांच्यासह नौका ताब्यात घेत देवगड बंदरात पुढील कारवाईसाठी देवगड परवाना अधिकारी यांच्या ताब्यामध्ये दिली आहे. कुणकेश्वर समुद्रकिनारी ओंमकार नावाची अक्षता अशोक चव्हाण (रत्नागिरी) यांची बोट मासेमारी करीत असताना मालवणच्याच मत्स्य विभागाने पकडून तीही बोट देवगड मत्स्य विभागाच्या ताब्यात दिली आहे. या दोन्ही रत्नागिरीच्या बोटींवरती मासळीचा कोणताही माल नसल्यामुळे दोन दिवस बोटी मासेमारी करुनही मासळी गायब होते कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी देवगड बंदरामध्ये दोन मासेमारी नौका पकडण्यात आल्या होत्या. त्या ही बोटींवरती मासळीचा कोणताच माल नसल्याचे नमुद करण्यात आले होते. यामुळे बोटींवरती कारवाई करणारे अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या