
प्रवाशाला तिकीट काढून तुमची बस दाखवितो, असे सांगून लुटणाऱ्या दोघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती लक्झरी पार्किंगमध्ये घडली होती. धीरज दिलीप गवळी (वय 30, रा. सहकारनगर ) आणि विक्रम अर्जुन ढगे (वय 31, रा. सुखसागरनगर, कात्रज ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष जाधव (वय 18) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष जाधव शनिवारी लातूरला जाण्यासाठी बसची चौकशी करीत होते. त्यावेळी तेथे आलेल्या धीरज आणि विक्रमने संगनमत करून संतोषला बसचे तिकीट काढून देतो असे सांगितले. दोघांनी संतोषला बस पार्किंगमध्ये नेत त्यांच्या खिशातील 500 रूपये जबरदस्तीने काढून घेतले होते. याप्रकरणी सहकानगर पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेत कारवाई केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे तपास करीत आहेत.






















































