प्रतीक्षानगर बेस्ट डेपोमध्ये ‘आगडोंब’, खासगी कंपनीच्या दोन बसेस जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमाच्या प्रतीक्षानगर आगारात रविवारी रात्री मातेश्वरी या खासगी कंपनीच्या दोन बसगाडय़ा जळून खाक झाल्या. बसेसच्या आगीपासून धुराचे मोठे लोळ हवेत पसरले होते. हा भीषण आगडोंब उसळताच शेजारच्या इतर बसगाडय़ा तातडीने दुसरीकडे हलवण्यात आल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

प्रतीक्षानगर आगारातील पार्किंग यार्डमध्ये रात्री अनेक बस उभ्या करून ठेवल्या होत्या. दिवसभर प्रचंड उष्णतेमध्ये शहराच्या रस्त्यावर धावलेल्या या गाडय़ांपैकी दोन बसेस अचानक आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. रात्री साडेअकराच्या सुमारास दोन बसेसना लागोपाठ आग लागण्याची ही घटना घडली. आगारातील सुरक्षारक्षक बिन नवाज यांना सर्वप्रथम एक बस पेट घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी अग्निशामक यंत्र शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे त्यांना ते शोधणे शक्य झाले नाही, असे बेस्टच्या अधिकाऱयांनी सोमवारी सांगितले.

मालाडमध्ये आणखी एका बसमधून धूर

प्रतीक्षानगरमधील घटना ताजी असतानाच मालाडमध्ये आणखी एका बसमधून धूर आला आणि खळबळ उडाली. ही बस मागाठणे आगाराच्या सेवेतील ‘डागा’ कंपनीची असून आगीच्या शक्यतेने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी संभाव्य आगीची दुर्घटना रोखली. धूर येताच बसमधून प्रवाशांना खाली उतरवले होते.

तीव्र उष्णतेचा तडाखा अन् आगीचा भडका

लागोपाठ दोन बसेसना आग लागण्याचे नेमके कारण बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले नाही. मात्र सध्या शहरात तीव्र उष्णतेचा तडाखा असल्यामुळे ‘ओव्हरहीट’ने गाडय़ांना आग लागल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी बेस्ट प्रशासन आणि पोलिसांमार्फत अधिक तपास केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.