
वाळूज परिसरात बुधवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये दोघांनी आत्महत्या केली तर एका युवतीचा डोंगरावरून तोल गेल्याने अपघाती मृत्यू झाला आहे. डोंगरावरून पडलेली तरुणी ही पोलीस भरतीची तयारी करत असल्याचे समजते.
वाळुज औद्योगिक परिसरातील पंढरपूर येथील गिरीराज हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय विकास सुभाष भांबरे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर वाळुज मध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय श्वेता नवनाथ गिरे या तरुणीने दोन महिन्यापूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. बुधवारी सकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
तिसरी घटना तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर व्यायाम करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा तोल गेल्याने खोल दरीत कोसळली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून तिला अर्धवट बेशुध्द अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. डोंगरावरून पडलेल्या मुलीचे नाव सुनिता देविदास शेळके(21) असे आहे.




























































