
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
घरफोडी करून 4 लाख 20 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या चोरट्यांना उरण पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली आहे. उरण तालुक्यातील सारडे गावातील अशोक गणपत पाटील यांच्या घरातून ही चोरी करण्यात आली होती. चोरट्यांनी मंगळवारी सकाळी 11 ते 5 च्या दरम्यान घरात ठेवलेल्या 2 हजार रूपयांच्या 120 नोटा, 500 रूपयांच्या 356 नोटा आणि दोन हजार रूपये सुट्टे पैस चोरून नेले होते. याबाबत उरण पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह संकेत रघुनाथ म्हात्रे (22) रा. सारडे याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घरात कोणी नसल्याचे पाहून या चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम 4 लाख 20 हजार घेऊन पोबारा केला. सध्याकाळी या चोरीची माहिती अशोक पाटील यांना लागल्यानंतर रात्री 11 वाजता याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर उरण पोलिसांनी तातडीने तपास करून आपल्या खबरी मार्फत माहिती घेऊन रात्री दिड वाजता आरोपींना अटक केली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एन.बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. निलेश तांबे यांच्या पथकाने हा तपास करून गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे. या बाबत उरण पोलीस अधिक तपास करत आहेत.






























































