पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लूटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक

267

पोलीस असल्याची बतावणी करून बनावट पिस्तूलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाच्या पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालक शुभम सुभाष पाटील (24, रा.अजिवली, ता. पनवेल) आणि विशाल सोपान मोर (19, वडझिरेगाव, ता. पारनेर, जि. नगर) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींनी 12 ऑगस्टला नेरूळ रेल्वेस्टेशनजवळ एका संगणक व्यावसायिकाला पोलीस असल्याची बतावणी करत दोन जणांनी पैशांची मागणी केली होती. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बनावट पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळचे रोख रक्कम 86 हजार लूटून नेले. मध्यवर्ती गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक एन.बी. कोल्हटकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेश गज्जल, निलेश तांबे, उपनिरिक्षक आर.टी काळे आणि कर्मचाऱ्यांनी या बाबत तातडीने तपास करून या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या  दाखविल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली. तसेच खारघर येथून एका कॉम्प्यूटर दुकानाचे शटर तोडून 2 लाख 50 हजार रोख रक्कम चोरल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. आरोपींना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या