श्रीरामपुरात दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, 16 लाखांच्या 18 दुचाकी हस्तगत

शिर्डी शहरातून दुचाकी चोरून त्याची विक्री करणारी टोळी गजाआड करण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरटय़ांकडून 16 लाखांच्या 18 दुचाकीसह 300 किलो चोरीचे आले जप्त केले आहे.

या संदर्भात पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे व निरीक्षक नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ऋषीकेश कैलास जाधव (रा. सूतगिरणी फाटा), दिलीप मोहन आढाव (रा. आगाशेनगर), किरण संतोष मोरे (रा. सूतगिरणी, श्रीरामपूर), दानिश मोहम्मद सय्यद (रा. ईदगाह मैदान, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आढाव हा आले चोरीप्रकरणात असल्याने त्याचा जामीन झाला. गौरव बागुल, संदीप सुडगे (दोघे रा. रमानगर, दत्तनगर) व रियाज हुसनीद्दीन शेख (रा. आझादनगर, मालेगाव) हे तिघे पसार आहेत.

11 ते 12 जानेवारीदरम्यान बोरकर यांच्या शेतातील सुमारे 1 टन वजनाचे व 60 हजार रुपये किमतीचे तयार आले पीक चोरटय़ांनी चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याच्या तपासादरम्यान निरीक्षक देशमुख यांना सराईत ऋषीकेश जाधव व त्याच्या साथीदारांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. 13 फेब्रुवारीला तो त्याच्या घरी सूतगिरणी फाटा येथे आला असता पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दिलीप आढाव व किरण मोरे यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून 18 हजार रुपये किमतीचे 300 किलो आले, 70 हजार रुपये किमतीची दुचाकी व 10 हजार रुपये किमतीची पाणबुडी असा 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शहर व परिसरात चोरी झालेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर शहर, नगर शहर व इतर ठिकाणाहून दुचाकी व मोपेड चोरल्याची कबुली दिली. गाडय़ा चोरतांना दानिश सय्यद, गौरव बागुल, संदीप सुडते यांच्यासह मिळून चोरीची कबुली दिली. दानिश हा त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने गाडय़ांची विक्री करीत असल्याचे सांगितले. दानिशला मालेगाव येथून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 18 दुचाकी जप्त केल्या आहेत.

मामाच्या मदतीने गाडय़ांची विक्री

n दुचाकी चोरीतील सर्व चोर शहरातीलच असून, यामधील दानिश सय्यद याचा मामा रियाज शेख हा मालेगावात राहत असून, त्याच्या मदतीने या दुचाकीची विक्री नाशिक जिह्यामध्ये ही टोळी करीत होती.