
सर्वांत मोठी कारवाई करूनही संगमनेर शहरातील दुचाकीचोरी थांबत नसल्याचे चित्र समोर आले आहे. दररोज किमान एक दुचाकी चोरीला जातच आहे. हा प्रकार संगमनेर शहराबरोबरच संगमनेर तालुक्यातील तीनही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडत आहे. यासह घरफोडी, गौण खनिज तस्करी, अवैध कत्तलखानेही सर्रासपणे सुरूच आहेत. त्यामुळे दुचाकीचोरांची टोळी पकडली म्हणून पोलीस अधीक्षकांनी संगमनेर शहर पोलिसांचे कौतुक केले असले तरी तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचेच दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलिसांनी नगर जिह्यासह आणि राज्यातील काही भागांतून दुचाकीचोरी करण्याची प्रकरणे उघडकीस आणली. यामध्ये एका टोळीकडून 51 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. ही मोठी कारवाई झाली असल्याचे सांगितले गेले. या कारवाईची माहिती देण्यासाठी थेट पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेरमध्ये पत्रकार परिषद घेत पोलिसांचे कौतुक केले. आता दुचाकीचोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत असतानाच, शहरात सातत्याने रोज दुचाकी चोरी होत असल्याचे गुन्हे घडत आहेत.
संगमनेर शहरासह संगमनेर उपविभागात असणाऱ्या संगमनेर तालुका, आश्वी, घारगाव या पोलीस ठाण्यांच्या दैनंदिन अहवालांमधून दररोज दुचाकी चोरी होत असल्याचे एकतरी प्रकरण घडत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या गुह्यांमधून चोरीला गेलेल्या दुचाकींची संख्या समजून येत आहे.
अवैध धंद्यांकडेही दुर्लक्ष
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेरात येऊन दुचाकी शोधण्याच्या संगमनेर पोलिसांच्या कामगिरीचा उदो उदो केला. त्यासाठी पत्रकार परिषददेखील घेतली. पोलीस अधीक्षकांनी शहर पोलिसांचे कौतुक केले. मात्र, संगमनेर उपविभागात सातत्याने होत असलेल्या चोऱया, घरफोडी, अवैध धंदे, गौण खनिज तस्करी, अवैध कत्तलखाने या संदर्भातील गंभीर गुन्हे या कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने मागे पडले आहेत. या गुन्ह्यांचा तपास लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.




























































