
जयगड बंदरानजिक बेपत्ता झालेली बोट आणि त्यातील माणसे यांचा पुन्हा शोध घेऊन या प्रकरणातील सत्य समोर आणा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. याबाबत बोलावलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय समिती कक्षात त्यांनी स्थानिकांकडून माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील तसेच पोलीस दल आणि कोस्ट गार्ड तसेच मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लगतच्या गावातील मच्छीमारांनी बोट जिंदल कंपनीच्या मोठ्या जहाजामुळे बुडाल्याची तक्रार केली आहे. मात्र बोटीचे कोणतेही अवशेष आणि त्यावरील खलाशांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. ही घटना 26 ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. बोट भरकटली असावी असे समजून या बोटीच्या मालकाने प्रारंभी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अपयश आल्याने 72 तासांनी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
पोलीस आणि कोस्टगार्ड आपापल्या पध्दतीने यासाठी शोधमोहिम राबविली. मात्र, अद्यापही यात काहीच सापडलेले नाही. याबाबत नव्याने शोधमोहिम राबवावी तसेच यात अपहरणाचा प्रकार तर नाही ना याचाही तपास करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले. यातील खलाशाचा मृत्यू झाला असेल परंतु मृतदेह प्राप्त होत नसेल तर मानवीय दृष्टीकोणातून जिंदल कंपनीने 4 लाखांची भरपाई द्यावी, असेही सामंत म्हणाले. बंदराकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर याच कंपनीची वाहने करतात तो रस्ता पूर्ण खराब झाला आहे. याच्या दुरुस्तीसाठी कंपनीने यापूर्वी प्रमाणे बांधकाम विभागास निधी देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशीही सूचना उदय सामंत यांनी या बैठकीत केली.
विकास कामांचा आढावा
अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. गणपतीपुळे विकास आराखड्यात 102 कोटींची 19 कामे प्रस्तावित आहे. त्याच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी माहिती घेतली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून केंद्र सरकारतर्फे पाली गावाच्या विकासासाठी 7.5 कोटीचा विशेष निधी नुकताच दिलेला आहे. यातील कामांबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. रत्नागिरी शहरातील सौंदर्यीकरण व सुशोभिकरणाची कामे तसेच नळपाणी योजना, नेहरु तारांगण, मिरकरवाडा विकास कामे, सागरी विद्यापीठासह इतर प्रस्तावित शैक्षणिक संकूलांच्या कामातील प्रगतीचा आढावा देखील घेण्यात आला.
दांडे आडोममध्ये कचरा प्रकल्प नाही
रत्नागिरी नगरपालिकेच्या वतीने प्रस्तावित दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाला स्थानिक गावकऱ्यांचा विरोध आहे. त्यांचे म्हणणे ऐकून या प्रकल्पाला आता या ठिकाणी न करण्याचा महत्वपूर्ण निर्णय एका बैठकीत झाला. या प्रकल्पासाठी एमआयडीसीने जागा उपलब्ध करून द्यावी. त्यानुसार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत 11 नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ असे सामंत म्हणाले. अशी जागा शोधण्याचे निर्देश त्यांनी याबैठकीत अधिकाऱ्यांना दिले.


























































