तिवरे धरण फुटीतील बाधितांच्या पुनर्वसनाचे काम लवकर पूर्ण करा – उदय सामंत

तिवरे धरण फुटीतील बाधित नागरिकांचे पुनर्वसन लवकरात लवकर होण्यासाठी सर्व विभागांनी काम करावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिल्या. उदय सामंत यांनी सोमवारी तिवरे धरण फुटीतील बाधितांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या आणि समस्यांबाबत चर्चा केली. संबंधित यंत्रणेकडून पुनर्वसनाच्या कामाचा आढावा घेतला.

या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पग्रस्तांना भेट देऊन पुनर्वसनाच्या कामाची माहिती घेतली. तसेच धरण दुरुस्ती काँक्रिटीकरण, पाण्याच्या योजना, पुनर्वसन या कामांचा आढावा घेतला. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अलोरे येथे केले जाणार आहे. ही जागा पंधरा दिवसात हस्तांतरित होण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करीत आहोत, असे सामंत यावेळी म्हणाले. जागा प्रशासनास हस्तांतरित झाल्यानंतर मुंबई येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे 5 कोटी रुपयांमध्ये सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधून दिली जातील. तिवरे धरण पुनर्वसनाबाबत असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून 14 घरांचे पुनर्वसन त्याच गावात इतर ठिकाणी तर 42 घरांचे पुनर्वसन अलोरे येथे होणार आहे. नवीन पुनर्वसित गावाचा रस्ते व बांधकाम याचा आराखडा लवकर तयार करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या पुनर्वसन कामाचा दर पंधरा दिवसांनी आढावा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, माजी आ.सदानंद चव्हाण,जि.प.अध्यक्ष रोहन बने, जि.प.बांधकाम सभापती विनोद झगडे,तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, माजी उपसभापती संतोष थेराडे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, संबंधित तहसीलदार आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या