राज्यपाल कोश्यारी, प्रवक्ते त्रिवेदी यांची हकालपट्टी करा, उदयनराजे यांचा भाजपला 28 तारखेपर्यंतचा अल्टीमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवरायांबद्दल वादग्रस्त आणि अवमानकारक वक्तव्ये करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू चतुर्वेदी यांची पदावरून हकालपट्टी करा, अशी आक्रमक भूमिका भाजपचे राज्यसभा सदस्य, खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे. शिवरायांच्या मुद्दय़ावर अजिबात माघार नाही, असे स्पष्ट करत 28 तारखेपर्यंतचा अल्टीमेटम उदयनराजे यांनी भाजपला दिला आहे.

राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवत्ते त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपला निर्वाणीचा इशारा दिला. या वेळी ते म्हणाले की, शिवाजी महाराज हे आयुष्यभर ताठ मानेने जगले. स्वराज्याची संकल्पना आणि सर्वधर्म समभाव हा विचार त्या वेळी शिवाजी महाराजांनी मांडला होता.

आज हिंदुस्थान ही जगात सर्वात मोठी लोकशाही आहे. या देशातील लोकांना एकत्रित ठेवायचं असेल तर शिवाजी महाराजांची विचारधारा सोडून चालणार नाही, असे ठणकावून सांगत शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱया कोश्यारी आणि त्रिवेदींवर हकालपट्टीची कारवाई करण्याची मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. मी याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटणार आहे. 28 तारखेपर्यंत राज्यपालांवर काय कारवाई करतात ते पाहू, असे ते म्हणाले.
मी खासदार नंतर, आधी शिवभक्त… पक्ष वैगेरे नंतर पाहू. मी तडजोडीचं राजकारण करत नाही. शिवरायांच्या मुद्दय़ावर अजिबात माघार नाही.