माणसाची शाश्वती नाही, तर ईव्हीएमचे काय; उदयनराजेंचा पुन्हा वार

udayanraje-bhosale

सामना ऑनलाईन । मुंबई

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुठलीहे यंत्र माणूसच तयार करतो. त्यामुळे ईव्हीएम यंत्र पूर्णपणे सुरक्षित आणि अचूक आहे, असे म्हणणे चुकीचे ठरले. माणसाची शाश्वती देता येत नाही, तर ईव्हीएम यंत्राचे काय घेऊन बसलात. जर संगणक हॅक होऊ शकत असेल तर ईव्हीएम यंत्रही हॅक होई शकते. ईव्हीएम हॅक होते, अशी शंका उपस्थित करण्यात काय गैर आहे, असा सवाल उदयनराजे यांनी केला. उदयनराजे यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम सदोष असल्याचा दावा केला. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाला सातारा लोकसभा मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्याचे आवाहन केले.

”लोकसभा निवडणुकीवेळी सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या मतदारसंघात बॅलेट पेपरच्या माध्यमातून फेरनिवडणूक घ्यावी. यानंतर निकालामध्ये फरक दिसला नाही तर आयुष्यात मिशा काय भुवयाही ठेवणार नाही,” असे आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला सातारा लोकसभा मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्याचे आवाहन केले. ”सातारा लोकसभा मतदार संघातील विधानसभेच्या सहा मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यात फरक आढळून आला होता. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला जाहीर आव्हान देतो की, साताऱ्यात पुन्हा एकदा बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घ्यावी. त्यासाठी मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. ईव्हीएम यंत्राच्या साहाय्याने निवडणूक घेताना जास्त खर्च येतो. हीच निवडणूक बॅलेट पेपरद्वारे झाली तर कमी खर्च येईल. या फेरनिवडणुकीचा बोजा मी मतदारांवर टाकणार नाही. यानंतरही निकालामध्ये फरक दिसला नाही तर मी आयुष्यभर मिशा काय भुवयांचे केसही ठेवणार नाही,” असे उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे यांनी स्वतंत्रपणे ही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. मी देशाचा सेवक म्हणून स्वत:चे मत व्यक्त करत असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार म्हणून नाही तर नागरिक या नात्याने मत व्यक्त करत आहे. आपली लोकशाही, संविधान टिकले पाहिजे, यासाठी मते व्यक्त करणे गरजेचे आहे. देशात न्यायव्यवस्था आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. मात्र, ते इंजिनिअर नाही, त्यामुळे ते यावर बोलू शकत नाही. मॅकनिकल, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर यावर बोलू शकतो कारण त्याला यातले ज्ञान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.