..तरीही कांजुरमार्गला जावं लागेल, हे आधीच बोललो होतो! कारशेडच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमचा विरोध मेट्रोला नव्हता तर कारशेडच्या जागेला होता. आज पर्यावरणाची हानी करून आरेत कारशेड उभारताय, तरीही काही काळाने कांजुरमार्गला जावंच लागेल, हे आम्ही आधीच बोललो होतो, अशी स्पष्टोक्ती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दै. लोकसत्ता आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक प्रश्न शिवसेनेकडून होणाऱ्या विरोधाविषयी होता. शिवसेनेकडून प्रत्येक प्रकल्पाला विरोध का केला जातो, या प्रश्नावर रोखठोक देताना ते म्हणाले की, आम्ही मेट्रोला कुठे आम्ही विरोध केला. मेट्रोचा विरोध दाखवा कुठे केलाय? आरे कारशेडच्या विरोधाला आम्ही कांजूरची जागा देऊ केली होती. आणि कितीही घाईगडबडीत मेट्रो प्रकल्प केला तरी ती उद्या करावीच लागेल, हे तुम्ही लिहून घ्या, आज कारशेड आरेत असली तरी उद्या कांजूरला जावंच लागेल. आम्ही तेच म्हणत होतो की, इथे पर्यावरणाची हानी करून पुन्हा तुम्ही कांजूरला जाणार, त्यापेक्षा कांजूरमध्येच मोठं कारशेड बांधा, ते पुढे 100 वर्षं चालेल. आरेच्या कारशेडची क्षमता 2031-32 पर्यंत पूर्ण होईल. तेव्हा तुम्हाला कांजुरला जावंच लागेल. हे जेव्हा होईल, तेव्हा आजच्या माझ्या बोलण्याची तारीख, वार, वेळ तुम्ही लिहून ठेवा. त्यामुळे मेट्रोच्या कारशेडच्या जागेला विरोध म्हणजे मेट्रोला नाही. कारण मेट्रोची पाहणी मी केली होती. कोस्टल रोडचं स्वप्न हेही आमचंच होतं, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.