
भाजपमध्ये कितीही मोठा गुंड, दरोडेखोर गेला तरी त्याला क्लीन चिट मिळते. नाही गेला तर ईडीची चौकशी लागते. आपल्यातूनही एक गद्दार गेला. त्याचा डायलॉग होता की काय झाडी, काय हॉटेल… आता त्याला आठवत असेल, ‘काय धाडी, काय पोलीस… जा आता तुरुंगामध्ये’, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
चांदिवलीत नूतनीकरण करण्यात आलेल्या शाखा क्र. 160च्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. भाजपचे हिंदुत्व वॉशिंग मशीनचे काम करणारे आहे. सत्तेसाठी ते वाट्टेल ते करताहेत. पर्यावरणाची हानी सुरू आहे. नाशिकमध्येही हिंदुत्वाच्या नावाने झाडे कापताहेत. भाजपचे हिंदुत्व म्हणजे ‘मूँह मे राम आणि बगल मे अदानी’, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. गेल्या तीन वर्षांत मुंबईतील हवा सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. नियोजनशून्य विकासकामामुळे ही स्थिती झाल्याचे त्यांनी सांगितले. खुद्द भाजपचे खासदार मिहिर कोटेचा यांनीच मेट्रो कशी प्रदूषणाला कारणीभूत ठरली आहे हे सांगितल्याचेही ते म्हणाले. याचे कारण एमएसआरडीसी त्या गद्दाराकडे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब, विभागप्रमुख सोमनाथ सांगळे, विभाग संघटक मनीषा नलावडे, विधानसभा संघटक भास्कर पाटील, उपविभाग समन्वयक राजेंद्र पाखरे, शाखाप्रमुख धनंजय पेंडुरकर उपस्थित होते.
शिवसेना शाखा म्हणजे समाजसेवेचे मंदिर!
कार्यक्रमासाठी जमलेल्या शिवसैनिकांचा प्रचंड उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कौतुक केले. हा उत्साह म्हणजे तुम्हाला आलेली जाग आहे. गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर आलेली ही जाग जाऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेना शाखा म्हणजे गद्दारांसारखी खंडणी केंद्रे नाहीत, तर समाजसेवेचे मंदिर आहेत. ज्या ठिकाणी सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा शिवसेना शाखेत मार्ग मिळतो, या शाखांचे पावित्र्य जपा असेही ते म्हणाले.






























































