आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी असीम सरोदे यांच्यासोबत, उद्धव ठाकरे यांची ग्वाही

अॅड. असीम सरोदे यांची सनद निलंबित करण्याच्या बार कौन्सिलच्या निर्णयावर प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज या निर्णयाचा निषेध करत असीम सरोदे यांना पाठिंबा दर्शवला. आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी असीम सरोदे यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिवसेना पक्ष व चिन्हाच्या संदर्भात निवडणूक आयोग व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे विश्लेषण करताना सरोदे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला गैरवर्तन ठरवून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाने त्यांची सनद निलंबित केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज या निर्णयाचा जोरदार समाचार घेतला. ‘हम करेसो कायदा आणि त्यावर आवाज उठवणारा देशद्रोही… या दिशेने देशाला फरफटत नेण्याचा हा घातक प्रयत्न दिसतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुले यांचा अवमान केला तरी त्याला माफी. त्याच्या कारभाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारले तरी काही बोलायचे नाही. मात्र त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल बोलणे आणि सत्य सांगणे म्हणजे मोठे पाप आहे असे मानायचे. ही लोकशाहीची अवहेलनाच आहे’, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

गप्प रहा आणि आमची गुलामगिरी करा या कटाचाच हा एक भाग आहे. या देशात आता सत्यासाठी संघर्षच करावा लागणार.’ – उद्धव ठाकरे