ऑक्सिजन आणि वीजपुरवठा खंडीत न होण्यासाठी खबरदारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीत माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरबी समुद्रातील तौकते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱयावरील जिह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अगोदरच तयारी करण्यात आली असून प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत चक्रीवादळासंदर्भातील तयारीचा आढावा घेतला. चक्रीवादळात नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने केलेल्या तयारीबाबत सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्बो व इतर कोविड केंद्रांत सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसऱया ठिकाणी हलविण्यात आले आहे. सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनाऱयावरील ऑक्सिजन उत्पादन करणाऱया प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत सुरू राहील यासाठी नियोजन केले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. किनाऱयांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचेही ते म्हणाले. मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

किनाऱयाजवळील 900 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प सुरक्षित – सीताराम कुंटे

सागरी किनाऱयाजवळील डोलवी जेएसडब्ल्यू ( 230 मेट्रिक टन), डोलवी आयनॉक्स (120 मेट्रिक टन), लिंडे तळोजा (245 मेट्रिक टन), आयनॉक्स रायगड (120 मेट्रिक टन), लिंडे प्राक्स एअर मुरबाड (120 मेट्रिक टन), असे साधारणतः 900 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करणारे प्रकल्प सुरक्षित राहतील याबाबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्हाधिकारी तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सागरी किनाऱयावरील जिल्ह्यांमध्ये कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध आहेत. यात रेमडिसिवीर, फेवीपिरावीर, मिथाइल प्रेडनिसोलोन, डोक्सीसिलीन, पॅरासिटामोल, हेप्रीन, एम्फोटेरीसीन बी आणि चाचणी किट्स, पीपीई किटस् इत्यादी पुरेशा प्रमाणात असतील हे पाहण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, प्रधान सचिव मदत पुनर्वसन असीम गुप्ता, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.