उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार, जळगावात आज वचनपूर्ती सभा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ रविवारी जळगावात धडाडणार आहे. पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जळगाव महापालिकेतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळय़ांचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून मानराज पार्क मैदानावर दुपारी 1 वाजता वचनपूर्ती सभा होणार आहे.

उद्धव ठाकरे यांचे सकाळी जळगाव येथे आगमन होणार असून त्यांच्यासमवेत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदींची उपस्थिती राहणार आहे. जळगाव महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळय़ाचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यानंतर 11.45 मिनिटांनी पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण होणार असून, तेथेच मानराज पार्कच्या मैदानावर दुपारी 12 वाजता वचनपूर्ती सभा होणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली.

स्थळ – मानराज पार्क
वेळ – दुपारी 1 वाजता