जेटबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून तोडगा काढू! उद्धव ठाकरे यांचे कामगारांना आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jet-workers-with-uddhav-thackeray

सामना प्रतिनिधी । मुंबई

जेट एअरवेजच्या कामगारांची रोजीरोटी वाचलीच पाहिजे असे ठामपणे सांगतानाच जेटबाबत पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. जेटच्या कामगारांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

गेल्या 17 एप्रिलपासून जेट एअरवेज कंपनी बंद पडली असून 22,500 कामगारांवर बेकारीची कुऱहाड कोसळली आहे. जेटचे कामगार शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली मोर्चे, धरणे आदी मार्गानी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. आज या कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

जेटचे पायलट, केबिन क्रू, इंजिनीयर्स, ग्राऊंड स्टाफ, लोडर, सिक्युरिटी यांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले गाऱहाणे मांडले. उद्धव ठाकरे यांनी कामगारांची बाजू समजून घेतली आणि शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले. नव्या केंद्र सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आपण यासंदर्भात पंतप्रधान, अर्थमंत्र्यांशी चर्चा करू असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कामगारांना धीर आला. जेट कंपनी पुन्हा सुरू होईल असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस संतोष चाळके, चिटणीस संजय कदम, गोविंद राणे आदी उपस्थित होते.