संकटाच्या काळातही शिवसेनाप्रमुखांच्या सोबत, ‘सर’ कायम राहिले, उद्धव ठाकरेंकडून आदरांजली

मनोहर जोशी सर हे मुख्यमंत्री होते, लोकसभा अध्यक्ष होते, केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते सच्चे शिवसैनिक होते. कोणत्याही पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येतच असतात, पण ‘सर’ संकटाच्या काळातही शिवसेनाप्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुखांचे पहिल्या फळीतील सहकारी होते. बेळगाव-कारवार सीमा आंदोलना वेळी शिवसेनाप्रमुखांना अटक झाली होती तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी होते. शिवसेनाप्रमुखांचे जिवाला जीव देणारे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून जाताहेत हे फार मोठे दुर्दैव आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

पूर्ण शिवसेना परिवाराच्यावतीने आणि ठाकरे कुटुंबीयांच्या वतीने मी मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. सरांसारखे सगळे जिवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते आणि आजही आहेत, म्हणूनच शिवसेना ही प्रत्येक वेळी संकटावर मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दौरा अर्धवट सोडला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौऱयावर होते. आज मेहकर तसेच अन्य ठिकाणी ते जनतेशी संवाद साधणार होते. मात्र मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच जनसंवाद दौरा अर्धवट सोडून उद्धव ठाकरे बुलढाणा येथून मुंबईत परतले. मुंबईत दाखल होताच थेट दादर स्मशानभूमी येथे जाऊन उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.