उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे तीन तास उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होते.

गणेश चतुर्थीनिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर पंधरा दिवसांतच पुन्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत सोबत होते. संजय राऊत यांनी नंतर माध्यमांना या भेटीबाबत माहिती दिली.

कुंदा मावशींचा आग्रह होता

ही राजकीय नाही, तर कौटुंबिक भेट होती, असे स्पष्ट करताना संजय राऊत पुढे म्हणाले, ‘अलीकडेच गणेशोत्सवात उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते तेव्हा राज यांच्या आई व उद्धव ठाकरे यांच्या मावशी कुंदाताईंनी ‘आता गर्दीत बोलता आलं नाही, परत भेटायला ये’ असा आग्रह केला होता. त्यानुसार उद्धव ठाकरे कुंदा मावशींना भेटण्यासाठी गेले होते. हेच आजच्या भेटीचं नेमकं कारण आहे.’